पुणे- वंचित बहुजन आघाडीच्या तिसऱ्या महाअधिवेशनात एमआयएमचे आमदार इम्तीयाज जलील यांनी संभाजी भिडे आणि रामदास आठवले यांचा खरपूस समाचार घेतला. जलील यांनी या सभेत हिंदीतून भाषण केले. सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, हीच गर्दी जर बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे खंबीरपणे उभी राहीली तर भिडे सारखे मनुवादी प्रवृत्तीचे लोकं कुठेही टिकणार नाहीत. पुढे त्यांनी रामदास आठवले यांच्यावर नाव न घेताच टीका केली. मंत्रीपदाच्या लालचेपोटी समाजाशी गद्दारी करणारे बाळासाहेब आंबेडकर नाहीत असा खोचक टोला त्यांनी आठवलेंना लगावला.
पुढे त्यांनी
भाजप, काँग्रेस, आरएसएस आणि हिंदुत्ववादी संघटनांवर टीकेची झोड उठवली.
देशात सध्या भितीचे
वातावरण असून कोणी प्रश्न उपस्थित केल्यास त्याला थेट पाकीस्तानात जाण्याचा सल्ला दिला
जातो. त्यामुळे सध्याचे सरकार हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारे आहे अशी टीका
जलील यांनी केली.
















